मध्यरात्री वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प
वैभववाडी l प्रतिनिधी : करुळ घाटातील धोकादायक वळणावर कंटेनर अचानक बंद पडल्याने घाटमार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
बुधवारी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास गगनबावड्यापासून काही अंतरावर असलेल्या धोकादायक वळणावर कंटेनर अचानक बंद पडला. त्यामुळे घाटमार्ग पूर्णपणे बंद झाला. घटनास्थळी उपस्थित वाहनचालकांनी तातडीने वैभववाडी व गगनबावडा पोलीस ठाण्यांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील व पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. त्यानंतर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घाटमार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
या घटनेमुळे मध्यरात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महसूल, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी तत्परतेने कार्यवाही केली.












