महामार्ग प्राधिकरण विरोधात स्वातंत्रदिनी अजित बेलवलकर यांचे उपोषण
गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत राष्ट्रीय महामार्ग यांच्या वतीने पथदीप बसविण्यात आले. मात्र पथदीप कर थकीत असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. याविरोधात तंटामुक्ती अध्यक्ष अजित बेलवलकर आक्रमक झाले असून त्यांनी स्वातंत्रदिनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
श्रृंगारतळी बाजारपेठेत रस्त्यालगत महामार्ग प्राधिकरनाने पथदीप बसविले. श्रृंगारतळी ही गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी आणि महत्त्वाचे ठिकाण असताना येथील पथदीपांबाबत बोंबाबोंबच आहे. या गजबजलेल्या शहरात रात्रीचा अंधार असतो. अधिक चौकशी केली असता त्याचे बिल राष्ट्रीय महामार्ग यांनी न भरल्याने सदर पथदीप गेली तीन वर्ष बंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. पथदीप बिल मंजुरीसाठी कोकण भवन, वाशी येथे गेले आहे, त्याला आज दोन वर्ष झाली. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीनेसुद्धा याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. त्यालाही साधे उत्तरदेखील आले नाही. तरी स्वातंत्रदिनापुर्वी येथील पथदीप सुरु न झाल्यास तहसीलदार कार्यालय गुहागर येथे उपोषण करणार असल्याचा इशारा अजित बेलवलकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.











