डांगमोडे मार्गांवरील एसटी बसफेरी बंद!

▪️ ग्रामस्थांची एसटी आगारात धडक

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे-डांगमोडे मार्गावरून पूर्ववत एसटी बस वाहतूक सुरू करण्यासाठी डांगमोडे ग्रामस्थांनी मालवण एसटी आगार व्यवस्थापक यांचे निवेदनद्वारे लक्ष वेधले. रस्ता सुस्थितीत नसल्याने बंद असलेली एसटी वाहतूक दोन दिवसापूर्वी चालू झाली होती. सदर मसुरे-डांगमोडे रस्त्यावर झाडे-झुडपे आणि मोठ्या झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे एसटी बसच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या मार्गावरील एसटी फेऱ्या पुन्हा बंद झाल्या होत्या.

परंतु, या समस्येचे गांभीर्य ओळखून डांगमोडे येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अडथळा ठरणारी सर्व झाडे-झुडपे व फांद्या तोडून रस्ता पूर्णपणे साफ केली . तसेच, या रस्त्यावर पडलेले खड्डे यापूर्वीच प्रशासनाकडून व ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्णपणे बुजवण्यात आलेले आहेत.

सध्या हा रस्ता एसटी बस आणि इतर अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे सुस्थितीत व सुरक्षित झालेला आहे. एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाल्यास स्थानिक ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

तरी मसुरे-डांगमोडे मार्गावरून लवकरात लवकर एसटी बस वाहतुकीस रीतसर परवानगी द्यावी व फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली. पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी समीर ठाकूर, प्रकाश ठाकूर, राजेंद्र ठाकूर, परशुराम ठाकूर, जगन्नाथ ठाकूर, अनिल ठाकूर, बाबुराव डांगमोडेकर आदी उपस्थित होते. एसटीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सकारात्मकता दर्शवत बस फेरी बाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.