मळगावच्या कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात रंगला साहित्याचा मेळा
सावंतवाडी । प्रतिनिधी : पावसाळी संध्याकाळी शब्दांच्या ओलाव्याने रसिकमने चिंब भिजवणारा ‘काव्यंजली’ हा भव्य काव्यसंमेलनाचा सोहळा प्राध्यापक उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात अत्यंत दिमाखदार वातावरणात आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला.
दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्याला काव्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. कोकणी, मालवणी आणि मराठी भाषेतील स्वरचित तसेच निवडक कवितांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मळगाव इंग्लिश स्कूल व मळगाव हायस्कूलच्या इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी पावसावर आणि निसर्गावर आधारित स्वतः लिहिलेल्या कविता अत्यंत आत्मविश्वासाने सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. या बालकवींना घडवणाऱ्या शिक्षिका सौभाग्यवती प्रज्ञा मातोंडकर मॅडम आणि सौभाग्यवती ऋतुजा सावंत भोसले मॅडम यांनीही आपल्या स्वरचित रचना सादर केल्या. मातोंडकर मॅडम यांच्या दोन कविता दोन विद्यार्थ्यांनी तितक्याच ताकदीने सादर करून कार्यक्रमात विशेष रंग भरला.
दोडामार्गचे ज्येष्ठ मालवणी कवी श्री. रामचंद्र शिरोडकर यांच्या ठसकेबाज मालवणी रचनेने आजच्या संध्याकाळी विशेष रंगत आणली. त्यांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी ‘वन्स मोर’ देत डोक्यावर घेतले. त्यानंतर त्यांनी सादर केलेली मराठी कविताही तितकीच भावस्पर्शी ठरली. शिरोड्यावरून खास उपस्थित राहिलेले मुक्त वाचक श्री. स्वप्निल वेंगुर्लेकर यांनी पावसावरील आणि मराठीतील कवितांच्या उत्कृष्ट मालवणी शैलीतील वाचनाने रसिकांची भरघोस पावती मिळवली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा २६ काव्यसंग्रहांचे लेखक साहित्यिक श्री. प्रकाश तेंडुलकर यांनी ‘कविता कशी लिहावी, कशी म्हणावी आणि कशी जगावी’ या विषयावर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसिद्ध विचारांनी विद्यार्थी आणि नवोदित कवींना नवी प्रेरणा दिली.
हा देखणा आणि दर्जेदार उपक्रम यशस्वी करण्यासाठी वाचन मंदिराचे सर्व संचालक मंडळ तसेच ग्रंथालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाबद्दल उपस्थितांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. साहित्य, भाषा आणि पिढ्यांमधील संवादाचा हा सुरेल संगम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील असाच ठरला. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन वाचन मंदिराच्या कार्यवाहक सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी आपल्या प्रभावी आणि रसाळ शैलीत केले.










