‘सुगी’ ॲपमुळे ४८ तासांत कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा – मनीष दळवी
कणकवलीत १९ प्राथमिक विकास संस्थांचा १०० टक्के कर्जवसुलीबद्दल गौरव
असलदे विकास सोसायटीचा सलग पाचव्या वर्षी विशेष सन्मान
कणकवली : सहकारी संस्थांचा खरा पाया हा शेतकरी असून विकास संस्थांनी केवळ कर्जवाटप करणाऱ्या संस्था म्हणून न राहता व्यवसायवृद्धी, पारदर्शक कारभार आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कर्जवसुली करणे हे अत्यंत कठीण आणि जबाबदारीचे काम असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नियमित परतफेडीकडे आणणाऱ्या विकास संस्थांचे पदाधिकारी, सचिव आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ तुलनेने कमी मिळाला असला तरी येथील शेतकरी नियमित कर्जफेड करणारा आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वासार्हतेची वेगळी ओळख जिल्ह्याने निर्माण केली आहे. विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कायम पाठीशी राहील, अशी ठाम ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात जिल्हा बँकेतर्फे प्राथमिक विकास संस्थांच्या १०० टक्के कर्जवसुलीबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मनीष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, गजानन गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, अंतर्गत लेखापरीक्षक के. डी. वरक, तालुका विकास अधिकारी दिगंबर गवाणकर, कणकवली शाखा व्यवस्थापक राजू घाडीगांवकर, संस्था संगणकीकरण विभागाचे व्ही. डी. हडकर, बँक अधिकारी राजू सावंत, नाना कुलकर्णी, अनिल सावंत यांच्यासह बँकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कणकवली तालुक्यातील असलदे विकास सोसायटीने बँक पातळीवर सलग पाचव्या वर्षी १०० टक्के कर्जवसुलीचा मान मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण, नांदगाव, शिवडाव, फोंडाघाट, नाटळ, हरकुळ बुद्रुक, सांगवे, कासार्डे, आयनल श्री नागेश्वर, तळेरे, वरवडे, कणकवली ग्रुप, कोळोशी ग्रुप, हळवल श्री शेवराई रवळनाथ, तिवरे–डामरे श्री अनभवानी, सातरल–कासरल, ओसरगाव श्री लिंगमाऊली आणि कलमठ या विकास संस्थांसह एकूण १९ संस्थांनी १०० टक्के कर्जवसुलीचा आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मनीष दळवी म्हणाले, आपला शेतकरी प्रामाणिक आहे. कर्जमाफीत कमी रक्कम मिळाली असली तरी विमा योजना आणि नुकसानभरपाईच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सन्मानाने मदत मिळाली आहे. प्रोत्साहन अनुदानात सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वाधिक लाभ मिळविणारा जिल्हा ठरेल. मी अध्यक्ष झालो तेव्हा जिल्ह्यात एकही संस्था १०० टक्के कर्जवसुली करणारी नव्हती. आज आठ संस्थांनी हा मान मिळविला असून त्यामध्ये कणकवली तालुक्यातील असलदे संस्था विशेष उल्लेखनीय आहे. संस्थेचे अध्यक्ष भगवान लोके, संचालक मंडळ, सचिव आणि सभासदांचे विशेष अभिनंदन करावे लागेल.
ते पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारातून सहकारी संस्थांचे संगणकीकरण झाल्यामुळे व्यवहारात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले आहे. सहकार कायद्यातील बदलांनुसार प्रत्येक संस्थेत स्वतंत्र सचिव नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. सचिवांना दरमहा १७ हजार ५०० रुपये वेतन मिळावे यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला असून भविष्यात त्यांच्या कामगिरीनुसार बोनस देण्याचाही विचार आहे.
संस्थांकडे स्वतःची जागा नसल्यास शासनामार्फत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. कार्यालय व गोदाम उभारणीसाठी मदत केली जाईल. काजू बोर्डाच्या गोदामांसाठी ५० टक्के अनुदान उपलब्ध असून नाबार्ड तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विकास संस्थांनी नवे व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
खारेपाटण विकास संस्थेने विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय यशस्वीपणे सुरू केल्याचा उल्लेख करत दोन-तीन संस्था एकत्र येऊनही असे उपक्रम राबवू शकतात, असे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेने सर्व प्रकारची कर्जे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून ‘सुगी’ ॲपच्या माध्यमातून कर्जप्रक्रिया अधिक जलद होणार आहे. ऑनलाइन प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत उत्तर आणि पुढील ४८ तासांत मंजुरी देण्याचे नियोजन आहे. शेतघर, कंपाऊंड वॉल, घरदुरुस्ती तसेच इतर गरजांसाठी पात्र सभासदांना संस्थेच्या शिफारशीनुसार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याशिवाय जिल्ह्यातील २२८ विकास संस्थांमधील प्रत्येकी एका प्रतिनिधीला अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात येणार असून दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी एका वर्षात तीन हजार जनावरे उपलब्ध करून देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. विकास संस्थांनी खाद्य विक्रीसह पूरक व्यवसाय सुरू करावेत. शेतकऱ्यांचा विमा विकास संस्थांमार्फत काढण्यावर भर दिला जाणार असून सहकार क्षेत्रात सेवाभाव आणि गुणवत्तापूर्ण कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी कणकवली तालुक्यातील १९ विकास संस्थांनी १०० टक्के कर्जवसुलीचा मान मिळविल्याबद्दल अभिनंदन केले. असलदे विकास संस्थेने सलग उत्कृष्ट कामगिरी करून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केल्याचे सांगत विकास संस्थांच्या पाठीशी जिल्हा बँक कायम उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी प्रास्ताविकात कणकवली तालुक्यातील विकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विकास संस्थांनी १०० टक्के कर्जवसुलीची उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले.
यावेळी असलदे विकास संस्थेचे अध्यक्ष भगवान लोके, हरकुळचे अध्यक्ष आनंद ठाकूर आणि फोंडाचे अध्यक्ष संतोष नानचे यांनी जिल्हा बँकेकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार मानले तसेच विकास संस्थांसमोरील विविध समस्या मांडल्या.










