बांदा: इन्सुलि गावठण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुलि क्रमांक ४ या केंद्र शाळेच्या दोन नादुरुस्त वर्गखोल्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी महाराष्ट्र खनिज विकास निधीतून ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आणि शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून या केंद्र शाळेच्या दोन वर्गखोल्यांची दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात छतातून पाणी गळणे आणि दरवाजे, खिडक्या व फरशी खराब झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठ्या अडचणी येत होत्या. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी यासाठी वारंवार मागणी केली होती. अखेर निधी मंजूर झाल्याने पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, या कामाचे ठेकेदार विशाल पोळ यांनी सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन इमारतीची व परिसराची पाहणी केली. सध्या सुरू असलेला पाऊस ओसरताच प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती ठेकेदारांनी दिली.
या पाहणीच्या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रांजल कांदे, सचिन पालव, संतोष मेस्त्री, केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, मुख्याध्यापक रुपेश परब आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कामात उत्तम दर्जा आणि आकर्षकता असावी, अशा सूचना नारायण राणे यांनी ठेकेदारांना दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व केंद्र शाळेच्या वतीने बबन राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.












