वन्यप्राण्यांच्या उपद्रवातही बळीराजाला वनविभागाचा ‘आधार’; धो-धो पावसात पीक नुकसानीची पाहणी

​दोडामार्ग | सुहास देसाई

दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोऱ्यासह बहुतांश गावांमध्ये वन्य हत्ती, गवे, रानडुक्कर, माकडे, केलडी, शेकरू आणि सालिंदर यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. केळी, नारळ, सुपारी, काजू आणि माणगा बांबू यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, वर्षांनुवर्षांची मेहनत क्षणात उद्ध्वस्त होत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र, अशा अत्यंत कठीण परिस्थितीत वनविभागाची टीम शेतकऱ्यांसाठी मोठा मानसिक आणि आर्थिक आधार ठरत आहे.

​पावसात जीव धोक्यात घालून नुकसानीचे पंचनामे
​अपेक्षेइतकी भरपाई मिळत नसली तरी बियाणे, खते आणि मेहनतीचा काही मोबदला शासनाकडून भरपाईच्या रूपाने मिळतो, ज्यामुळे शेतकरी पुन्हा नव्या आशेने उभा राहतो. या नुकसानभरपाईची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक, वनमजूर, रोजनदारी कर्मचारी आणि हत्ती हाकारा पथक दिवस-रात्र धडपड करत आहेत.
​सध्या सुरू असलेल्या धो-धो पावसात धोकादायक नदी-नाले, ओढे आणि डोंगरदऱ्या पार करून हे कर्मचारी थेट बाधितांच्या शेतबांधावर पोहोचत आहेत. या कामात त्यांना कृषी सहायक आणि महसूल अधिकारी (तलाठी) यांचीही उत्तम साथ मिळत आहे.

​हेवाळे येथील जिद्द आणि तत्परता
हेवाळे येथे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेला ओढा जीव धोक्यात घालून पार करत पीक नुकसानीच्या पाहणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतबांधावर पोहचताना वनरक्षक अनिल राख व अर्जुन ठाकूर यांची सुरू असलेली धडपड ही वनविभागाच्या संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

​तिलारी खोऱ्यात हत्तींचा उपद्रव हाताळणे, हत्ती ड्युटी पार पाडणे आणि वन संवर्धनाची नित्याची कामे सांभाळूनही वन कर्मचारी ही पंचनाम्याची कामे तत्परतेने करत आहेत. या संवेदनशील आणि वेगवान कारवाईचे सर्व शेतकरी वर्गातून जोरदार स्वागत होत आहे.

​वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असली, तरी सध्या वनविभागाकडून मिळणारा हा दिलासा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरत आहे. वनविभाग आणि शेतकरी यांच्यातील हा समन्वय असाच मजबूत राहिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.