राणे साहेबांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद! – सभापती मिलिंद नाईक

वाढदिवस विशेषांकातून कार्याची दखल; ‘दैनिक प्रहार’च्या उपक्रमाचे व्यक्त केले विशेष कौतुक

स्वप्निल कदम-कुडाळ:     “माझ्या राजकीय प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन, आमदार निलेश राणे यांनी दाखविलेला विश्वास आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभले. सामान्य कार्यकर्त्यापासून कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदापर्यंतचा माझा प्रवास हा त्यांच्या विश्वासामुळेच शक्य झाला. त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आणि जबाबदारी आहे,” असे भावनिक मनोगत कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी व्यक्त केले.

दैनिक प्रहारशी वाढदिवसानिमित्त बोलताना त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. “राणे साहेबांनी शिकविलेली जनसेवेची भूमिका, आमदार निलेश राणे यांची विकासाची दृष्टी आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे संघटन कौशल्य हेच माझ्या पुढील वाटचालीचे प्रेरणास्थान आहे. जनतेची निस्वार्थ सेवा, विकासकामांना गती आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हाच माझ्यासाठी खरा वाढदिवसाचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी दैनिक प्रहारने त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित केलेल्या विशेषांकाचेही त्यांनी मनापासून कौतुक केले. “एखाद्या कार्यकर्त्याच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कार्याची इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने दखल घेऊन विशेषांक प्रकाशित करणे ही कौतुकास्पद बाब आहे. ‘दैनिक प्रहार’ने माझ्या कार्यप्रवासाला दिलेले स्थान माझ्यासाठी प्रेरणादायी असून, या विशेषांकामुळे माझ्यावर अधिक जबाबदारी आली आहे. यापुढेही जनतेचा विश्वास सार्थ ठरेल, अशाच पद्धतीने विकासकामांचा ध्यास कायम ठेवेन,” असे समाधानही त्यांनी व्यक्त केले.