मच्छीमारांची तयारी अंतिम टप्प्यात; बंदरे पुन्हा गजबजणार

दापोली विशेष प्रतिनिधी:

कोकणातील मच्छीमारी हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दोन महिन्यांची मासेमारी बंदी संपल्यानंतर १५ ऑगस्टपासून समुद्रात पुन्हा मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील बंदरांमध्ये पुन्हा एकदा बोटींची लगबग आणि मच्छीमारांची धावपळ पाहायला मिळणार आहे.
मासेमारी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार बांधवांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बोटींची रंगरंगोटी, इंजिनांची देखभाल, जाळ्यांची दुरुस्ती यासोबतच डिझेल, बर्फ, अन्नसामग्री आणि मासेमारीसाठी आवश्यक साहित्याची जुळवाजुळव युद्धपातळीवर सुरू आहे.
यंदाचा मासेमारी हंगाम चांगला आणि भरघोस ठरावा, अशी अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे समुद्र शांत होताच आणि बंदीचा कालावधी संपताच कोकणातील प्रत्येक बंदरातून मासेमारीसाठी बोटी समुद्राच्या दिशेने रवाना होणार आहेत.