मोबाईलच्या पडद्याआड भविष्य अंधारात जाऊ देऊ नका!

सिद्धकला हायस्कूलमध्ये नशामुक्तीचा जागर; विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा

 *पन्हाळा प्रतिनिधि:* 

 *प्रतापसिंह काळे* 

 

 

मोबाईल हा आजच्या काळातील गरजेचा साधन आहे; मात्र त्याचा अतिवापर ज्ञानाचे दार उघडण्याऐवजी मुलांच्या एकाग्रतेवर, आरोग्यावर आणि सामाजिक जीवनावर परिणाम करणारे व्यसन ठरू शकतो. त्यामुळे मोबाईलच्या अतिवापरापासून तसेच तंबाखू, गुटखा, दारू आणि अन्य व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी स्वतःला दूर ठेवावे, असा संदेश सिद्धकला हायस्कूल, मल्हारपेठ येथे आयोजित ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा अभियान’ कार्यक्रमातून देण्यात आला.

दादी प्रकाशमणीजी यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या अभियानात विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली. ‘एक संकल्प–नशामुक्त भारत, सशक्त युवा–समृद्ध भारत’ या विचारातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागृती करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुण्या प्रो. गीता बहनेजी, डॉ. प्रमिला भोसले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोबाईलचा वापर आवश्यकतेपुरता आणि विवेकाने करावा. सतत स्क्रीनवर राहण्यापेक्षा पुस्तकांशी मैत्री, मैदानी खेळ, कला, संवाद आणि सर्जनशील उपक्रमांना वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानी कला शिक्षण प्रसारक मंडळ मल्हारपेठ-सावर्डेचे अध्यक्ष श्री. मारुतीराव परितकर साहेब होते. सरपंच श्रीमती शारदा पाटील, उपसरपंच श्री. राजेंद्र महाजन, मुख्याध्यापक श्री. के. एच. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

पाहुण्यांचे स्वागत संस्थाध्यक्ष मारुतीराव परितकर यांच्या हस्ते करण्यात आले.सूत्रसंचालन श्री. जाधव पी. पी. यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक श्री. के. एच. पाटील यांनी मानले.‘व्यसन आधी वेळ चोरते, मग आरोग्य आणि शेवटी भविष्य; म्हणून मोबाईल असो वा कोणतेही व्यसन—वापरावर नियंत्रण ठेवणे हीच खरी स्वातंत्र्याची सुरुवात आहे,’ असा आशय या अभियानातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.