सावंतवाडी मतदारसंघातील ३३ केव्ही वीज वाहिन्या भुमिगत होणार

राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे आदेश : आ. दीपक केसरकर यांचा पाठपुरावा 

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वारंवार उद्भवणाऱ्या विजेच्या समस्यांवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि ३३ केव्ही वीज वाहिन्या भुमिगत करण्यासाठी राज्यमंत्री ना.श्रीम. मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडीचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विनंतीवरून ही बैठक सातव्या मजल्यावरील एम.एस.आर.डी.सी. कार्यालय, निर्मल भवन, मुंबई येथे पार पडली.

सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या भागातील मोठा परिसर हा जंगल व दाट झाडीने व्यापलेला आहे. पावसाळ्यात होणारा सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे झाडे उन्मळून पडणे व फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडणे अशा घटना घडतात. यामुळे पोल पडणे आणि वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या निर्माण होतात. वीज वाहिन्या भुमिगत केल्यास झाडांमुळे होणारा उपद्रव थांबेल आणि नागरिकांना विनाखंडित वीजपुरवठा मिळेल, असा मुद्दा मांडत आमदार दीपकभाई केसरकर यांनी वाहिन्या भुमिगत करण्याची आग्रही मागणी केली.

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांना अनुसरून राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सावंतवाडी मतदारसंघातील ३३ केव्ही विद्युत वाहिनी भुमिगत करण्यासाठी तात्काळ सर्व्हे करून मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच मतदारसंघातील विजेच्या इतर तातडीच्या समस्यांवरही तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार दीपक केसरकर, महावितरण व महापारेषणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, व्हीसीद्वारे जोडलेले सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, महावितरण/महापारेषणचे संचालक (प्रकल्प/वित्त/वाणिज्य), रत्नागिरी महावितरणचे मुख्य अभियंता, कराड महापारेषणचे मुख्य अभियंता, सिंधुदुर्ग महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्यासह इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.