न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची वनविभागाकडे मागणी
सावंतवाडी: न्हावेली गावात बिबट्या आणि गव्यांचा भरवस्तीत मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठल परब आणि अनिकेत धवण आदी उपस्थित होते.
न्हावेलीसह परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नुकतेच, सोमवारी रात्री न्हावेली ग्रामपंचायत परिसरात भरवस्तीत एक बिबट्या फिरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. बिबटे आणि गवे थेट मानवी वस्तीत फिरू लागल्याने ग्रामस्थांना रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे.
अलीकडेच मळेवाड कोंडुरा येथे बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, न्हावेली गावात थेट घरांच्या अंगणात बिबट्याचा वावर दिसून आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. यापूर्वीही गावातील काही शेतकऱ्यांच्या जनावरांवर बिबट्याने हल्ले करून मोठे नुकसान केले आहे.
याप्रकरणी वन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या नुकसान भरपाईवर पार्सेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यास वन विभाग तो भरून देऊ शकेल का, असा संतप्त सवालही श्री. पार्सेकर यांनी निवेदनातून विचारला आहे. न्हावेलीतील ग्रामस्थांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.













