देवरूख हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख हायस्कूलमध्ये शुक्रवारी रानभाजी महोत्सव व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ग्रामीण भागांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या रानभाज्यांबद्दल मुलांना माहिती व्हावी व त्यांचे औषधी गुणधर्म समजावेत या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन प्रशालेमध्ये विज्ञान छंद मंडळ, हरितसेना व स्काऊट गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

प्राथमिक गटातून ३२ तर माध्यमिक गटातून १२ गटांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक व गाढे अभ्यासक श्री. प्रताप नाईकवडे , श्री अतिश माईणकर व D CAD कला महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. अभिजीत पाटील परीक्षक म्हणून उपस्थित राहिले. तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री. खाके पी.पी. उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.मधुकर कोकणी यांनी केले. याप्रसंगी श्री. प्रताप नाईकवडे यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग पाहून समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांना रानभाज्या ओळखता याव्यात त्याची लागवड व व्यावसायिक दृष्ट्या त्यांचे महत्त्व समजण्याची गरज व्यक्त केली. तर श्री माईणकर यांनी भविष्यातील रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. श्री. अभिजीत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला व विविध आजारांशी लढण्याचे दृष्टीने रानभाज्यांचे महत्त्व सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कोकणी सर यांनी भविष्यातील अन्न संकटाच्या दृष्टीने स्थानिक अन्नधान्याचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातून भारंगी, टाकळा, अळू, फोडशी ,करटोली अशा विविध रानभाज्या गोळा करून,त्यांच्या पाककृती बनवून, त्यांची सुंदर सजावट करून ती सादर केली .या महोत्सवास श्री समीर काबदुले विषय तज्ञ पंचायत समिती व श्री रणजीत बनसोडे वनस्पतीशास्त्र प्राध्यापक ए.एस. पी. कॉलेज देवरुख, तसेच ए.एस. पी. कॉलेजचे काही विद्यार्थी यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी परीक्षक, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध पाककृतींचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांची मेहनत पाहून सर्वांनीच विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या महोत्सवासाठी प्रशालेतील शिक्षक श्री. गणपत्ये डी. आर., श्री. मांडवकर डी.बी.सौ. रुक्के जे. जे., सौ. खाडे व्ही. एस. सौ. केतकर आर.ए. , सौ. भागवत एम. आर. व प्रशालेतील सर्व सेवक वर्ग यांनी मेहनत घेतली.