चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मौजे गझमल पिंपळी बुद्रुक येथे एका बंद घराचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. मूळचे पिंपळी बुद्रुक येथील रहिवासी असलेले आणि सध्या परळ (मुंबई) येथे राहणारे विलास रघुनाथ गझमल (वय ६१) यांचे पिंपळी बुद्रुक येथील घर २ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडी-कुलूप कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेची चोरी केली. यामध्ये ३ लाख १० हजार ९११ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ६ हजार ३२१ रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी तक्रारदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.











