डॉ. बाबासाहेब आंबेडकर (BASE) शिष्यवृत्ती परीक्षेत साळशीची तन्वी भोसले जिल्ह्यात प्रथम

केंद्रशाळा साळशी नं. १ च्या शिरपेचात मानाचा तुरा

शिरगांव (प्रतिनिधी) :          देवगड येथे ५ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (BASE) शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा साळशी क्रमांक १ येथील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु. तन्वी तानाजी भोसले हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल तिला १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.

    या परीक्षेला केंद्रशाळा साळशी नं. १ मधून इयत्ता चौथीतील एकूण पाच विद्यार्थी सहभागी झाले होते. या पाचही विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांसह यश मिळविले. त्यामध्ये तन्वी भोसले हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

    तन्वीच्या या यशामागे तिची जिद्द, मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. मुख्याध्यापक प्रकाश झाडे, पदवीधर शिक्षक ज्ञानोबा हाके आणि उपशिक्षिका स्मिता कोदले यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

     तन्वी भोसले हिने यापूर्वीही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले असून, विविध बक्षिसे पटकावली आहेत. तिच्या या सातत्यपूर्ण यशामुळे तिची अभ्यासू वृत्ती, जिद्द आणि स्पर्धात्मक परीक्षांतील गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.

तन्वीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.