सिंधुदुर्ग एलसीबीच्या कारवाईत तिघे ताब्यात
सुमारे १ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी: सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारिवडे-बिलेवाडी येथील जंगल भागात एका पडक्या घराच्या परिसरात अमली पदार्थाची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणाऱ्या तीन आरोपींना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या धडक कारवाईत पोलिसांनी १९७ ग्रॅम गांजा आणि दोन मोपेड मोटारसायकली असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारिवडे-बिलेवाडी येथील जंगलात एका पडक्या घराजवळ ८ ऑगस्ट २०२६ रोजी काही इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन दोन पंच आणि प्रमाणित वजनकाटाधारकांना सोबत घेऊन पोलीस पथकाने घटनास्थळी रणनीती आखून सापळा रचला.
या कारवाई दरम्यान सुनील श्रीकांत मुदगल (वय २६, रा. अनंत पॅलेसच्या पाठीमागे, कारिवडे पेडवेवाडी, ता. सावंतवाडी), अमर मारुती धोत्रे (वय २३, रा. कारिवडे पेडवेवाडी, ता. सावंतवाडी) आणि चंद्रप्रकाश पलठण प्रजापती (वय ३४, रा. गवळीतिठा सावंतवाडी, मूळ रा. भुसूडा उर्फ हनुमानगंज, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) हे तिघे अमली पदार्थाचा व्यवहार करताना रंगेहाथ आढळून आले. पोलिसांनी अत्यंत शिताफीने या तिघांनाही ताब्यात घेतले.
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे ६ हजार रुपये किमतीचा आणि १९७ ग्रॅम वजनाचा पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत ठेवलेला उग्र वासाचा हिरवट गांजा मिळून आला. यासोबतच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५० हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची यमाहा फसिनो दुचाकी (क्रमांक MH 07 AE 4379) आणि ६० हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची होंडा ॲक्टिव्हा दुचाकी (क्रमांक GA 11 B 6274) असा एकूण १ लाख १६ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एएसआय सदानंद राणे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, डॉमिनिक डिसोझा, राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा आणि आशिष जामदार यांच्या पथकाने केली आहे.












