सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६ मध्ये सावंतवाडी येथील वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा विशेष गौरव करण्यात आला. ५ ते १० कोटी रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार असणाऱ्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल संस्थेला हा जिल्हास्तरीय बहुमान मिळाला आहे.
या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री. दीपकजी पटवर्धन साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक सन्माननीय श्री. सोपानजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते पतसंस्थेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वीर सावरकर पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे व्यवस्थापक श्री. विष्णूकांत परब, वसुली अधिकारी श्री. किशोर चिटणीस आणि लिपिक कु. मनाली राजाध्यक्ष यांनी हा पुरस्कार अत्यंत अभिमानाने स्वीकारला.
वीर सावरकर पतसंस्थेने आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि ग्राहकांना दिलेल्या दर्जेदार सेवांच्या जोरावर हा टप्पा गाठला आहे. या यशामुळे पतसंस्थेच्या विश्वासार्हतेत आणखी भर पडली असून, सावंतवाडी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.













