उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: शहरातील १८५० कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि कागल येथील शाहू महाराज पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आज दि. ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यामध्ये नूतनीकरण झालेल्या सीपीआरचे लोकार्पण करण्यात आले.
या नूतनीकरणामध्ये रुग्णालयाची मुख्य प्रवेशद्वार कमान, मॉड्युलर बर्न आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर आयसीयू, एम.आर.आय. विभाग, अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेड तसेच विविध वैद्यकीय विभागांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच आ.सतेज पाटील यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार,एकनाथ शिंदे यांनी सतेज पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
यानंतर,नूतनीकरण झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिस अपार्टमेंटचेही उद्घाटन करण्यातआले.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी छत्रपती शाहू समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर प्रायव्हेट हायस्कूल येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.यावेळी ‘कोल्हापूर वर आमचं विशेष प्रेम आहे’ कोल्हापूर शहराने महायुतीला भरभरून दिले आहे. या शहराला यापूर्वीही काही कमी पडू दिले नाही आणि यापुढेही काही कमी पडू देणार नाही.कोल्हापूर शहराच्या विकासाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या पूर्ण करू,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी महायुतीतील सर्व नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












