‘विकसित भारत’ घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे : खासदार नारायण राणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा केला गौरव..

भाजपाची वेंगुर्लेत ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न….

वेंगुर्ले : दाजी नाईक 

‘एक व्यक्ती देशासाठी केवढे मोठे काम करू शकते, याचे उत्तम उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घालून दिले आहे. मग आपणही आपल्या क्षमतेनुसार जिल्ह्यासाठी काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. मोदी साहेबांनी सार्वजनिक जीवनात २५ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून गेल्या बारा वर्षांत जे अथांग कार्य केले आहे, त्याचा रिझल्ट आज देशासमोर आहे. भाजप सत्तेत येण्यापूर्वीचे काम आणि मोदी साहेब आल्यानंतर झालेले कार्य यात तुलनाच होऊ शकत नाही. त्यांनी दुपटीपेक्षा जास्त पटीने विकासकामे केली आहेत. त्यांनी देशाच्या विकासासाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रत्येकाने एकजुटीने काम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खास. नारायण राणे यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग असलेले ‘सेवा ज्योती अभियान’ आज बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरात उत्साहात राबविण्यात आले. जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये ‘सेवा ज्योती’ पदयात्रा काढून शेवटी वेंगुर्ले येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशा राष्ट्रसेवेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ही सभा वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेकर सभागृहात पार पडली. प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाईव्ह मार्गदर्शन पार पडले. यानंतर या सभेला प्रारंभ झाला. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सेवा ज्योती यात्रा जिल्हा संयोजक संदीप मेस्त्री, युवराज लखमराजे, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, पं स सभापती शंकर घोरे, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर यांच्यासहित जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घटकाचा—महिला, मागासवर्गीय, आदिवासी व सर्व धर्म-जातींचा विचार करून त्यांनी ही जनसेवा केली आहे.” पंतप्रधानांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या भाषणानंतर कार्यकर्त्यांनी ‘विजय शपथ’ घेतली. यावर बोलताना राणे म्हणाले, “पंतप्रधानांचे विचार आपण ऐकले आहेत, आता ते प्रत्यक्षात आचरणात आणून कार्यान्वित करणे गरजेचे आहे. एक मोदी जर देशासाठी एवढे मोठे कार्य करू शकतात, तर कार्यकर्त्यांनीही थोडी थोडी जबाबदारी उचलल्यास आपला जिल्हा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देश जगाच्या पाठीवर एक ‘विकसित राष्ट्र’ म्हणून अधिक अभिमानाने ओळखला जाईल. येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.”

आपल्या ४० वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत नारायण राणे म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत मी जनतेच्या आशीर्वादाने तब्बल १० पदांवर काम केले आणि जिथे गेलो तिथे कधीही कमी पडलो नाही. आजही मला माझ्या जिल्ह्यासाठी आणि इथल्या गरीब जनतेसाठी खूप काही करायचे आहे. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिले आहेत.” वेंगुर्ले येथील भाजप कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे अतिशय नेटके आणि उत्तम नियोजन केल्याबद्दल खासदार राणे यांनी सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक केले आणि उपस्थितांचे आभार मानले.

*जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली सर्वांना संकल्प शपथ*

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपल्या मनोगता पूर्वी उपस्थित सर्वांना संकल्प शपथ दिली. ते बोलताना पुढे म्हणाले की, समाजासाठी, पक्षासाठी आणि देशासाठी निस्वार्थ भावनेने काम करणे हीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची खरी ओळख आहे. ही प्रेरणा आपल्याला मिळते ती नेतृत्वाकडून. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक राज्यातील पंचवीस वर्षांच्या सेवेला अभिवादन करत आहोत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी साडेबारा वर्षे काम केले आणि त्यानंतर भारताचे पंतप्रधान म्हणून साडेबारा वर्षे देशाची सेवा केली. अशा प्रकारे जवळपास पंचवीस वर्षांचा त्यांचा प्रशासनाचा आणि सार्वजनिक सेवेचा प्रवास आपल्या समोर आहे. मात्र, मोदीजींच्या या प्रवासाची सुरुवात केवळ मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाल्यानंतर झालेली नाही. त्यापूर्वीची त्यांची अनेक दशके संघटनेच्या कामाला समर्पित झाली आहेत. खासदार राणे यांनी गेल्या चार दशकांमध्ये या जिल्ह्यासाठी, कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले आहे, ते अत्यंत समर्पित भावनेने दिलेले आहे. त्यांच्या कार्यातूनही आपल्याला सेवाभाव आणि समर्पणाची प्रेरणा मिळते.

आपणही त्याच भावनेने पुढे गेले पाहिजे. पक्षाचे काम करताना पद, प्रसिद्धी किंवा व्यक्तिगत अपेक्षा न ठेवता संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी काम करण्याची वृत्ती प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सेवा ज्योती यात्रेबद्दल जिल्हा संयोजक संदीप मेस्त्री यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नगराध्यक्ष दिलीप गिरप तर सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

*वेंगुर्लेतील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचे नारायण राणे यांनी केले कौतुक*

वेंगुर्ल्यातील या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि उत्साह पाहून आपण प्रभावित झाल्याचे सांगत खासदार नारायण राणे म्हणाले, “तुमच्यातील ही एकजूट प्रत्येक कामात आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात कायम दिसली पाहिजे. या एकजुटीतूनच जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेता येईल.” आयोजनाबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या सह सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे कौतुक केले.