शक्तीपीठ महामार्ग कोकणातील प्रमुख रस्ते व बंदरांना जोडणार

पुनर्सर्व्हेचे आदेश : आमदार दीपक केसरकर यांची माहिती
​सावंतवाडी । प्रतिनिधी :
शक्तीपीठ महामार्ग थेट गोव्याबरोबरच कोकणातील रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण एक्स्प्रेस हायवेसह प्रमुख मार्गांना जोडला जावा, या दृष्टीने पुन्हा पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिले आहेत. हा महामार्ग या प्रमुख मार्गांशी जोडल्यास कोकणच्या सर्वांगीण विकासाला आणि स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.
​आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, मतदारसंघातील प्रमुख प्रश्नांविषयी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शक्तीपीठ महामार्ग सध्या ज्या पद्धतीने प्रस्तावित आहे, त्याचा विशेषतः वेंगुर्ले बंदराच्या विकासाला अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे हा महामार्ग मळगाव येथून रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग आणि प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडला जावा, अशी मागणी अनिल गायकवाड यांच्याकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत त्यांनी सकारात्मक सर्व्हे करण्याचे आश्वासन दिले आहे.
कोकणातील पायाभूत सुविधांचा विकास करताना स्थानिक व्यापार आणि बंदरांचा वापर वाढणे आवश्यक आहे. हा महामार्ग थेट गोव्याकडे निघून गेल्यास स्थानिक अर्थकारणाला लाभ होणार नाही; मात्र मळगाव येथून जोडणी मिळाल्यास रेडी बंदराच्या मालवाहतुकीला गती मिळून वेंगुर्ला बंदराचा आर्थिक व पर्यटन विकास साधता येईल.
​शक्तीपीठ महामार्ग थेट कोकणशी जोडण्याला बांदा येथील शेतकऱ्यांचा विरोध होता, कारण यामुळे मोठ्या प्रमाणावर फळबागायती प्रभावित होत होत्या. त्यामुळे या मार्गात बदल करण्यात आला असून लागवडीचा भाग टाळण्याचे प्रयत्न आहेत. या नव्या रचनेत चौकुळ हे उंचावरील शेवटचे गाव जोडले जाईल. तेथून हा मार्ग दोडामार्ग तालुक्याला जोडला जाऊन तेरवण मेढे, मोर्ले पारगड ते कोनाळकट्टा मार्गे किंवा मुख्य रस्त्याद्वारे गोव्याला कनेक्ट होईल. आंबोली आणि चौकुळ पठाराला जोडणारा हा मार्ग मोर्ले पारगड रस्त्याद्वारे दोडामार्ग-तिलारी मार्गे नॉर्थ व साऊथ गोव्याशी कनेक्ट होईल.
​या व्यतिरिक्त, कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली असून, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात आदेश दिले असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
​तसेच विधानसभा मतदारसंघातील वीज व्यवस्था बळकट करण्यासाठी इन्सुली ते आडाळी एमआयडीसीपर्यंत महत्त्वाची वीज वाहिनी टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये ४९ नवे उद्योग येणार असल्याने वीज वितरण व्यवस्था सक्षम केली जात आहे. या कामात अडचण आल्यास संवाद साधून मार्ग काढला जाईल, अन्यथा गरज भासल्यास पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच या भागात ५६ टक्के ग्रीन कव्हर असल्याने वादळात वीज खंडित होते; यावर उपाय म्हणून हायवेद्वारे ११५ कोटी रुपयांची अंडरग्राउंड वीज केबल टाकण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे पाठवण्याचे आदेश ऊर्जा राज्यमंत्री ना. बोर्डीकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. दोडामार्ग येथील कमी व्होल्टेजची समस्या सोडवण्यासाठी निरंतर वीज योजनेअंतर्गत ८० ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आदेश दिले असून, गणेशोत्सवापूर्वी ही कारवाई पूर्ण होईल. आंबोली व चौकुळ गावांसाठी स्वतंत्र वीज वाहिनी आणि ब्रेकर्स मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.