वैभववाडी प्रतिनिधी :
अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समिती आखवणे-भोमचे अध्यक्ष रंगनाथ (भाई) दत्ताराम नागप वय ६४ रा. कुसूर पुनर्वसन यांचे शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आखवणे-भोम परिसरासह प्रकल्पग्रस्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष म्हणून रंगनाथ नागप यांनी प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी आग्रही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रश्नांना शासनस्तरावर वाचा फोडण्यात आली.
मुंबईतील भांडुप येथील पार्थ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे मुख्य सल्लागार म्हणूनही ते कार्यरत होते. ‘भाई’ या टोपणनावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
रंगनाथ नागप यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच परिसरातून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्यावर रविवारी सकाळी आखवणे पुनर्वसन गावठाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, बहीण, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.











