कर्नाटकातील पर्यटकाचा आंबोलीत सर्पदंशाने मृत्यू

मुख्य धबधब्याच्या खाली आंघोळ करताना सर्पदंश

​सावंतवाडी :
आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील एका युवकाचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. गंगाधर मरिअप्पा कोरावार (वय ३८, रा. कमलापूर, विजय नगर, कर्नाटक) असे मृत पावलेल्या पर्यटकाचे नाव आहे. या घटनेमुळे आंबोली पर्यटन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधर हे रविवारी आपल्या अन्य सहा मित्रांसमवेत आंबोली येथे वर्षापर्यटनासाठी आले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आंबोलीतील मुख्य धबधब्यावर सर्व मित्र आंघोळ करत असताना गंगाधर यांना अचानक सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

​मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून सावंतवाडी येथे रुग्णालयात आणले जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

. ​गंगाधर यांचा मृतदेह सध्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. कर्नाटकातील त्यांचे नातेवाईक सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर सोमवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल, अशी माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.