विविध साहित्यिक उपक्रमांचे नियोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी येथील ऐतिहासिक श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीत वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांची आखणी करण्यासोबतच संस्थात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी कोमसाप सावंतवाडी शाखाध्यक्ष दीपक पटेकर हे होते. तर व्यासपीठावर सचिव राजू तावडे आणि उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हुतात्म्यांना व देशभक्तांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून ते सर्वानुमते कायम करण्यात आले. तसेच सन २०२५-२०२० या आर्थिक वर्षाच्या जमा-खर्चासह नफा-तोटा पत्रकाचे वाचन करून त्यास उपस्थितांनी एकमुखाने मान्यता दिली.
आगामी वर्षात मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचारासाठी विविध स्पर्धा, कार्यशाळा, साहित्य संमेलने तसेच नियमित होणारे वार्षिक साहित्यिक उपक्रम अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या सर्वसाधारण सभेला जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. अरूण पणदूरकर, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. गणपत शिरोडकर, प्रा. एस. एन. मुक्कनवार, सौ. उषा परब, सहसचिव विनायक गांवस, विठ्ठल कदम, भरत गावडे, सुस्मिता चव्हाण, विजय देसाई, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक, अभय नेवगी, संतोष पवार, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, रामदास पारकर आणि मीरा कासार आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या शेवटी वार्षिक सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम वाचन मंदिर प्रशासनाचे तसेच उपस्थित सर्व सभासद व साहित्यिक रसिकांचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी आभार मानले.












