
सावंतवाडी:स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून आज सोमवारी सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने ‘भव्य तिरंगा यात्रा’ अत्यंत उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचा औपचारिक शुभारंभ राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा संयोजक संदीप गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत – भोंसले, उप नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि युवराज लखम राजे भोंसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या तिरंगा यात्रेत महायुतीचे स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब, विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, मायकल डिसोजा, तसेच जिल्हा बँक संचालक महेश सारंग, विद्याधर परब आणि माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर यांचा समावेश होता. याशिवाय पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, जावेद खतीब, केतन आजगावकर, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर व महिला शहराध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर यांनीही यात्रेचे नियोजन व नेतृत्व केले.
शहरभरातून निघालेल्या या भव्य तिरंगा यात्रेत विविध नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच तसेच भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सर्व स्तरांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देशप्रेमाच्या घोषणा देत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण सावंतवाडी शहर या यात्रेमुळे देशभक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.












