ओटवणे (प्रतिनिधी ) सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचे रत्न साहित्य, समाजप्रबोधन आणि नि:स्वार्थ सेवाभावी कार्यामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे लेखक, कवी व समाजसेवक संतोष दत्ताराम चिले यांना २०२६ चा भारत सरकार मान्यताप्राप्त प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ (National Bharat Gaurav Award 2026) प्रदान करण्यात आला. यामुळे ओटवणे गावाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा भव्य दिमाखदार वितरण सोहळा रविवारी बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन, पुणे येथे पार पडला.
संतोष चिले यांनी आपल्या प्रबोधनात्मक लेखणीच्या आणि कवित्वाच्या माध्यमातून समाजात नेहमीच प्रबोधन केले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ,व्यसनमुक्ती, अमली पदार्थ विरोधी जन जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि निसर्ग संवर्धन यांसारख्या सामाजिक विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन व काव्यरचना केल्या आहेत. ‘निसर्ग हाच नव नारायण’, ‘तरुणाईला नशेचा विळखा’ आणि ‘अंधश्रद्धेतील अंधार’, स्त्री सन्मान यांसारख्या विषयांवरून त्यांनी तरुणांना सकारात्मक दिशा देण्याचे कार्य केले आहे. तसेच निराधार, अनाथ बालके आणि गरजूंना मदत करण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. याआधीही त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला.त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार,दादासाहेब फाळके नॅशनल प्रेरणा पुरस्कार,राजा शिवछत्रपती पुरस्कार,इंडियन एक्सलन्स अवॉर्ड,युगंधरा इंटरनॅशनल सावरकर काव्यमुकुटमणी पुरस्कार, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शब्दभूषण पुरस्कार, कथागौरव पुरस्कार २०२६,यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या अष्टपैलू व नि:स्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा समजला जाणारा ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या या मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा पुनः एकदा सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून साहित्य, सांस्कृतिक सामाजिक तसेच विविध स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












