विहिरीत पडलेल्या सश्याला वनविभागाने दिले जीवदान

उदाळवाडीत रेस्क्यू ऑपरेशन; शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचला वन्यजीव

 

 *प्रतापसिंह काळे* 

 *पन्हाळा : प्रतिनिधी* 

 

विहिरीत पडलेल्या सश्यासाठी ती विहीर जणू मृत्यूचा सापळाच बनली होती. वर हिरवंगार शेत, आजूबाजूला वैरणीची दाट वाढ आणि खाली खोल विहिरीत जगण्यासाठी धडपडणारा ससा… मात्र एका शेतकऱ्याच्या नजरेत ही धडपड आली आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे त्या मुक्या जीवाला पुन्हा मोकळ्या निसर्गाची वाट मिळाली.पन्हाळा तालुक्यातील वाघवे पैकी उदाळवाडी येथील ‘झऱ्याचा ओपा’ शेत परिसरात शनिवारी सकाळी ही घटना घडली. शेतकरी संदीप यशवंत आरंडे हे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेतात गेले असता त्यांना विहिरीत ससा पडल्याचे निदर्शनास आले. विहिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करूनही त्याला यश येत नव्हते.आरंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच कोतोली बिटचे वनरक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे संभाजी चौगले घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची खोली, सश्याची अवस्था आणि परिसरातील परिस्थिती पाहून त्यांनी कौशल्याने रेस्क्यू मोहीम राबवली. अखेर प्रयत्नांना यश आले आणि विहिरीच्या अंधारात अडकलेल्या सश्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

 

हा ससा अंदाजे एक ते दीड वर्षांचा असून त्याचे वजन सुमारे दोन किलो असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्याची प्रकृती ठीक असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. भटक्या कुत्र्यांच्या पाठलागापासून बचाव करताना ससा विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उघड्या विहिरी वन्यजीवांसाठी ठरताहेत मृत्यूचे सापळे

ग्रामीण भागात शेताच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरी केवळ पाण्याचे स्रोत राहिलेल्या नाहीत, तर अनेकदा त्या वन्यजीवांसाठी अनाहूत संकट ठरत आहेत. ससा, भेकर, गवा, बिबट्या यांसारखे वन्यजीव विहिरीत पडण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. हिरवाईच्या शोधात शेतात येणाऱ्या या जीवांना विहिरीची खोली कळत नाही आणि एकदा खाली पडल्यावर बाहेर पडण्याचा मार्गही सापडत नाही.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विहिरींना संरक्षक जाळी किंवा सुरक्षित कठडे बसवावेत, तसेच विहिरीत वन्यजीव आढळल्यास स्वतःहून धोकादायक प्रयत्न न करता तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.एका शेतकऱ्याची नजर, वनविभागाची तत्परता आणि काही हातांचे प्रयत्न… एवढ्यामुळे एका मुक्या जीवाला पुन्हा जंगलाची, मोकळ्या आकाशाची आणि जगण्याची संधी मिळाली.