महानगर गॅसचे बिल आता पोस्ट ऑफिसमध्ये भरता येणार
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील महानगर गॅसच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा उपलब्ध झाली असून, आता शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसचे मासिक बिल स्वीकारले जाणार आहे. या सुविधेमुळे शहरातील सुमारे १० हजार महानगर गॅस ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे. महानगर गॅसचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत असून शहराच्या विविध भागांत त्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे विद्यमान बिल भरणा केंद्रांपर्यंत जाणे काही ग्राहकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. ही बाब लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाशी संपर्क साधून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महानगर गॅसकडून देण्यात आला होता. भारतीय डाक विभागाचे व्यापक नेटवर्क आणि नागरिकांशी असलेले दैनंदिन संपर्काचे नाते लक्षात घेऊन हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानुसार भारतीय डाक विभाग आणि महानगर गॅस यांच्यात १० ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय डाक विभागाच्या वतीने अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग रत्नागिरी आणि महानगर गॅस लिमिटेडच्या वतीने श्री. आशीष प्रसाद जी.ई. यांच्या उपस्थितीत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी प्रधान डाकघर, रत्नागिरी कलेक्टोरेट पोस्ट ऑफिस, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस, एस.टी. कार्यालयातील पोस्ट ऑफिस यासह शहरातील इतर पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसचे मासिक बिल भरता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सहजपणे बिल भरता येणार असून वेळ, प्रवासाचा खर्च आणि श्रम यांची बचत होणार आहे. भारतीय डाक विभागामार्फत स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, पोस्टल जीवन विमा, विविध बचत योजना, लॉजिस्टिक सेवा, पासपोर्ट सेवा, आधार नोंदणी व अद्ययावतीकरण अशा विविध नागरिककेंद्रित सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यात आता महानगर गॅस बिल भरण्याच्या सुविधेची भर पडली आहे. महानगर गॅसच्या सर्व ग्राहकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग आणि महानगर गॅस यांच्याकडून करण्यात आले आहे.











