लांजा शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल लांजा राष्ट्रवादी आक्रमक

शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील सर्व खड्डे १५ ऑगस्ट पुर्वी भरा, अन्यथा खड्ड्यात वृक्षलागवड, न.पं.मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लांजा (प्रतिनिधी) लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या लांजा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेवरून लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून 15 ऑगस्ट पर्यंत सर्व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरा अन्यथा या खड्ड्यात वृक्ष लागवड करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांनी दिला आहे.

दरम्यान याबाबतचे निवेदन, आज सोमवारी लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांना सादर करण्यात आले. या निवेदनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांनी म्हटले आहे की, लांजा शहरातील रस्त्यांबरोबरच अन्य विकास कामांसाठी लांजा नगरपंचायतीला गेल्या तीन ते चार वर्षांत करोडो रुपयांचा निधी आलेला होता. लांजा शहरात लागलेल्या निधी प्राप्त च्या बॅनर वरून हे बाब आम्हाला समजली होती. तसेच ते सर्व टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून. कामे सुद्धा झाली आहेत. मात्र या निधीतून झालेल्या अंतर्गत रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने बहुतांशी सर्व रस्ते हे खड्डेमय झाले आहेत.

खड्डेमय झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? ठेकेदार, प्रशासन की लोकप्रतिनिधी? हे आपण ठरवावे. व जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी. अशी मागणी तालुका अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी केली आहे. तसेच जर ठेकेदार जबाबदार असेल तर प्रशासन कारवाई का करत नाही? जर प्रशासन जबाबदार असेल तर लोकप्रतिनिधी शांता का? असा सवाल दाजी गडहिरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, खड्डेमय बनवलेले सर्व खड्डे १५ ऑगस्ट पुर्वी भरले नाही तर याच रस्त्यांमधील. खड्ड्यात वृक्षलागवड केली जाईल, असा इशारा शेवटी तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांनी दिला आहे .