एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकांसाठी’; कादवड नं. २ शाळेतील चिमुकल्यांचा जवानांना अनोखा स्नेहबंध

चिपळूण (प्रतिनिधी) : देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कादवड नं. २ येथे ‘एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या जवानांसाठी पाठविण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत शाळेत विशेष राखी तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मुख्याध्यापक देवराव शिसोदे आणि माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी तसेच पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या. आपल्या लाडक्या सैनिकांसाठी राखी तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. त्यांच्या चेहऱ्यावर देशप्रेम आणि जवानांप्रती कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे जाणवत होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती तसेच माजी विद्यार्थी समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांप्रती आदराची भावना रुजविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.