शिष्यवृत्ती परीक्षेत पीएमश्री जिल्हा परिषद शाळा लांजा नं.१ चे सुयश

पंचायत समिती सभापतींकडून विद्यार्थी आणि शाळेचा गौरव

लांजा (प्रतिनिधी) पी एम श्री जिल्हा परिषद शाळा लांजा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जनरल शहरी विभागातून जिल्हा गुणवत्ता यादीत शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.आराध्या राजेंद्र निमकडे हिने जिल्ह्यात २५ वा क्रमांक व तालुक्यात द्वितीय क्रमांक, चेतन्या रमेश कांबळे हिने जिल्ह्यात ३८ वा क्रमांक व तालुक्यात तृतीय क्रमांक, तर प्राणेश विनायक माळी याने जिल्ह्यात ८५ वा क्रमांक व तालुक्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.

या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा डायटचे प्राचार्य श्री.शिवलकर , वरिष्ठ अधिव्याख्याता श्री.लठ्ठे, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. मनिषा लाखण,शिक्षण विभाग लांजा येथील विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी , केंद्रप्रमुख सौ. अर्चना पेणकर , शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत असल्याचे मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच उज्ज्वल यश संपादन करून शाळेचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.