गुहागर ओबीसी बांधव उद्या तहसील कार्यालयावर धडकणार

गुहागर/प्रतिनिधी – मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याच्या शासन अध्यादेशाच्या निषेधार्थ गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती हजारोंच्या संख्येने तहसीलदार कार्यालय गुहागर येथे उद्या 15 सप्टेंबरला सकाळी ११ वाजता धडक देऊन तहसिलदारांना निवेदन देणार आहेत.

या सर्व आंदोलनाच्या पूर्वतयारीची बैठक शृंगारतळी येथील गुहागर बाजार हॉल येथे ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या अध्यादेशानुसार, जरी आता कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे जातीचे दाखले देण्यात येणार असले तरी भविष्यात या निर्णयाचा विपरीत परिणाम सर्व ओबीसी घटकांवर होणार असल्याने गुहागर तालुक्यातून ओबीसी प्रवर्गात येणारे सर्व घटक समाज संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून एकवटले आहेत. या पूर्वतयारीच्या सभेवेळी माजी सभापती राजेश बेंडल, रामचंद्र हुमणे, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे सेक्रेटरी निलेश सुर्वे, माजी सदस्या नेत्रा ठाकूर, पद्माकर आरेकर, प्रदीप बेंडल ,गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष नवनीत ठाकूर, नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय पवार, विश्वकर्मा सुतार समाजाचे अध्यक्ष धामणस्कर गुरुजी, वैश्य समाजाचे अध्यक्ष अजित बेलवलकर, विजय मसुरकर, रामाणे गुरुजी, रविंद्र कुळे, ॲड. प्रमेय आर्यमाने, समीर डिंगणकर आदीसह गुहागर तालुका ओबीसी समाजातील सर्व प्रतिनिधी, न्यातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.