दापोली : दापोली तालुक्यातील पालगड-कातळवाडी येथे भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे ७ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दापोली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालगड-कातळवाडी येथील शुभांगी विष्णू दळवी यांच्या घरात सकाळी ७.४५ ते ९.१० या कालावधीत ही चोरी झाली. घराच्या मागील बाजूस असलेल्या स्वयंपाकघरातील स्लायडिंग खिडकीतून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेतील दागिन्यांची पर्स चोरून नेण्यात आली.
चोरट्याने लंपास केलेल्या ऐवजामध्ये सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र, ७० हजार रुपये किमतीचे सुमारे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, १ लाख ५० हजार रुपये किमतीची सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ५० हजार रुपये किमतीच्या सुमारे ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या आणि १ लाख रुपये किमतीचे सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, असा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकूण चोरीचा मुद्देमाल सुमारे ७ लाख ९० हजार रुपये किमतीचा आहे.
याप्रकरणी शुभांगी विष्णू दळवी यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक १५८/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील संबंधित कलमांनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.










