रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टी दारु धंद्यावर शहर पोलिसांनी धाड टाकत तब्बल 68 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा.सुमारास करण्यात आली.
संदीप वसंत जाधव (49,रा.मिरजोळे बौध्दवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मिरजोळे पाटीलवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टी चालवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी त्याठिकाणी धाड टाकली. या धाडीत गुळ व नवसागर मिश्रीत कुजके रसायन,पत्र्याचे बॅरल,प्लास्टिक पाईप,लाकडी चाटू, प्लासिटक कॅन,ॲल्युमिनियमची डेग,स्टिल नळी असा एकूण 67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.










