तळेरे येथे मुंबई विद्यापीठाच्या अप्रेंटिसशिप पदवीचा अभ्यासक्रम सुरू होणार 

NEP च्या नवीन शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगाराची संधी -मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी

वेंगुर्ला येथील सागरी संशोधन केंद्रात ओशन मॉडलिंगचे काम सुरू होणार 

सावंतवाडी :प्रतिनिधी     

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कोकणातच चांगल्या संधी निर्माण करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे प्रयत्न सुरू असून प्रत्येक महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नवीन शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रमाची रचना, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगार व उद्योगाच्या संधी तसेच संशोधनाच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्त महाविद्यालयांमध्ये २०२३ पासून सुरू झाली असून २०२४ पासून बिगर स्वायत्त महाविद्यालयांमध्येही या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा आणि बैठका घेण्यात येत आहेत. विद्यापीठाची संबंधित टीम, तज्ज्ञ व्यक्ती तसेच परीक्षेचे आयटी समन्वयक जिल्हास्तरावर जाऊन महाविद्यालयांकडून माहिती घेत असून आवश्यक ते संरचनात्मक व तांत्रिक सहकार्य केले जात आहे.

 

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासक्रमाची रचना ८८ क्रेडिट्स आणि सहा सत्रांमध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी तिसऱ्या वर्षात इंटर्नशिपला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. महाविद्यालयांनी अभ्यासक्रमातील उपलब्ध कार्यपद्धतीचा कशा पद्धतीने वापर केला आहे, याचा आढावा घेऊन पुढील टप्प्यातील अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी विद्यापीठाकडून मार्गदर्शन केले जात आहे.

 

कोकणातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध विषयांचा स्थानिक गरजांशी मेळ घालण्याचा प्रयत्न आहे. कोकणातील आठ ते दहा क्लस्टर तयार करून पर्यटन, मत्स्यव्यवसाय, प्रदूषण, वित्त, भूगोल यांसह स्थानिक अर्थव्यवस्था व विकासाशी संबंधित विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोकणातील विद्यार्थी शिक्षणानंतर बाहेर न जाता कोकणातच नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्थिर व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

 

वेंगुर्ला येथील सागरी संशोधन केंद्रात ओशन मॉडेलिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. गोवा आणि हैदराबाद येथील संशोधन केंद्रांच्या सहभागातून हे संशोधन पुढे नेण्यात येणार असून, त्यातून सागरी संशोधनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी ‘Apprenticeship Embedded Degree Programmes’ अंतर्गत तळेरे-बांबर्डे येथे उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सहा सेमिस्टरपैकी किमान तीन सेमिस्टर उद्योगक्षेत्रात काम करून अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी या उपक्रमातून सहा महिन्यांची इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच प्रत्यक्ष ऑन-द-जॉब ट्रेनिंगच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमांनुसार दरमहा विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड देखील दिले जाणार आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी जिल्हास्तरावर शिक्षकांच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. या कार्यशाळांमध्ये एआयशी संबंधित विविध साधनांचा वापर करून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या स्वायत्ततेबाबत विद्यार्थी आणि पालकांनी मनात कोणताही किंतू किंवा शंका बाळगू नये, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले आहे. स्वायत्त महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नसून उलट त्यांना रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक पालकांमध्ये अशी भीती आहे की, महाविद्यालय स्वायत्त झाल्यामुळे त्याचा विद्यापीठाशी असलेला संबंध संपतो आणि पदवीचे महत्त्व कमी होते. यावर स्पष्टीकरण देताना कुलगुरूंनी सांगितले की, स्वायत्त महाविद्यालये ही विद्यापीठाशी संलग्नच राहतात. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अंतिम पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाचे नाव आणि लोगो कायम असतो. त्यामुळे या पदवीची अधिकृतता आणि जागतिक मान्यता पूर्णपणे टिकून राहते.बदलत्या काळाची गरज ओळखून स्वायत्त महाविद्यालयांना स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. यामुळे उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते.

 

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे पूर्णपणे डिजिटलीकरण करण्यात येणार नसून पाठ्यपुस्तक आणि डिजिटल माध्यम या दोन्ही स्तरांवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची पद्धत कायम राहणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांचे स्वागत युवराज लखमराजे भोसले तसेच एसपीके चे प्राचार्य डॉ . भारमल, प्राध्यापक गणेश मर्गज यांनी केले