यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’ उत्साहात

जिल्हास्तरीय देशभक्ती कला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी । प्रतिनिधी : ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या वतीने जिल्हास्तरीय ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव २०२६’ चे अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत, समूह नृत्य व नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्ह्यातील अनेक विविध मराठी व इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांनी या स्पर्धांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपापल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर कलाविष्कारांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. यातील चुरशीच्या ठरलेल्या समूह नृत्य स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडेने द्वितीय आणि न्यू इंग्लिश स्कूल, मातोंडने तृतीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे, रंगलेल्या समूहगीत गायन स्पर्धेत ओझर विद्यामंदिर, कांदळगाव संघाने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने द्वितीय आणि न्यू इंग्लिश स्कूल, मातोंडने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व कलाप्रकारांचे परीक्षण प्रीती डिसोजा, हवाबी शेख व नंदिता यादव यांनी अत्यंत पारदर्शकपणे केले. स्पर्धांमधील सर्व गुणवंत विजेत्या स्पर्धकांना उपस्थितांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात आले.

या प्रेरणादायी सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सीईओ ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई आणि उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन क्रेसिडा डिसोजा व संपदा राऊळ यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागातून आणि देशप्रेमाने ओसंडून वाहणाऱ्या कलाविष्कारातून साकारलेला हा संपूर्ण महोत्सव राष्ट्रप्रेमाची जाज्वल्य भावना जागविणारा आणि सर्व उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.