ब्रह्माकुमारी स्वरूपा बहन यांचे आकस्मिक निधन; खेडच्या ईश्वरीय परिवारावर शोककळा

खेड (प्रतिनिधी) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र, खेड येथे ईश्वरीय सेवा आणि समाजजागृतीचे कार्य करणाऱ्या ब्रह्माकुमारी स्वरूपा बहन यांचे ११ ऑगस्ट रोजी रात्री अडीचच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने खेडसह रत्नागिरी जिल्ह्यातील ईश्वरीय परिवारावर शोककळा पसरली आहे.
स्वरूपा कांतीलाल गांधी असे त्यांचे मूळ नाव असून खेड हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांनी काही काळ महाड आणि मुंबई येथे ईश्वरीय सेवाकार्य केले. गेल्या चार वर्षांपासून त्या खेड सेवा केंद्रात कार्यरत होत्या. राजयोग प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. तसेच व्यसनमुक्ती अभियानात सक्रिय सहभाग घेत समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित विविध सामाजिक, आध्यात्मिक आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. नम्र स्वभाव, हसतमुख वृत्ती, सत्यता, स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या गुणांमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मुंबई, पुणे, महाड, कोल्हापूर, इस्लामपूर, रत्नागिरी, दापोली आणि चिपळूणसह विविध ठिकाणांहून ईश्वरीय परिवारातील सदस्य व नातेवाईक खेडमध्ये दाखल झाले. १२ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता ‘ओम शांती’च्या ध्वनीसह आध्यात्मिक वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सेवाकार्याच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
लहानपणापासून त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू होते आणि त्या औषधे घेत होत्या. मात्र, त्यांचे अचानक निधन झाल्याने ईश्वरीय परिवारासह नातेवाईकांना मोठा धक्का बसला.
निःस्वार्थ सेवा, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि समाजजागृतीच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या ब्रह्माकुमारी स्वरूपा बहन यांच्या स्मृती त्यांच्या सेवाकार्यातून सदैव जिवंत राहतील. त्यांच्या निधनाने खेडच्या ईश्वरीय परिवारात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना खेड सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी गीता बहन यांनी व्यक्त केली.