देवरूख महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट हा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्यावतीने अभिवादन व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शुभारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी दीप प्रज्वलन करून डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यानंतर प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी फित कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालयशास्त्रातील अतुलनीय योगदानाची माहिती दिली. त्यांनी मांडलेली ग्रंथालयशास्त्राची पंचसूत्री आजच्या डिजिटल युगातही तितकीच महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. “ग्रंथ हे वापरण्यासाठी आहेत” आणि “ग्रंथालय ही सतत विकसित होणारी संस्था आहे” हे डॉ. रंगनाथन यांचे विचार आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रा. मायंगडे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता ग्रंथालयाचा वापर न करता व्यक्तिमत्त्व विकास, विचारांची समृद्धी आणि ज्ञानवृद्धीसाठी ग्रंथालयाशी जवळीक निर्माण करावी, असे आवाहन प्रा. मायंगडे यांनी केले. तसेच ग्रंथ प्रदर्शनाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ग्रंथ प्रदर्शन हे केवळ ग्रंथांचे प्रदर्शन नसून विचारांचे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक पुस्तकामागे एका लेखकाचे आयुष्य, अनुभव, चिंतन आणि ज्ञान दडलेले असते.

ग्रंथालयातील एखादे पुस्तक इतिहासाची ओळख करून देते, एखादे विज्ञान समजावते, एखादे साहित्याच्या विश्वात घेऊन जाते, तर एखादे महान व्यक्तीचे जीवन उलगडते. एखादे पुस्तक करिअरची दिशा दाखवते आणि कदाचित “एखादे पुस्तक तुमचे आयुष्य बदलू शकते!” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. “आज या प्रदर्शनातून फक्त पुस्तके पाहू नका; एक पुस्तक निवडा, ते हातात घ्या, त्याची पाने चाळा, त्यातील एखादा परिच्छेद वाचा आणि स्वतःला विचारा- “हे पुस्तक मला काय देऊ शकते?” असे आवाहन करून आपल्या वाणीला त्यांनी विराम दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तकांना आपले मित्र मानावे आणि अभ्यासाव्यतिरिक्तही सातत्याने इतर अवांतर वाचन, मनन व चिंतन करावे, असा मोलाचा सल्ला दिला. तसेच ग्रंथालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रंथप्रदर्शने, वाचनविषयक उपक्रम, पुस्तक परीक्षण, वाचन प्रेरणा कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विविध ज्ञानवर्धक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असेही त्यांनी याप्रसंगी आवाहन केले.

विद्यार्थ्यांना याप्रसंगी ग्रंथालयातील विविध प्रकारची पुस्तके, संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा साहित्य, नियतकालिके तसेच विविध विषयांवरील ज्ञानसंपदेची माहिती करून देण्यात आली. ग्रंथालयाने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला बहुसंख्य विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके चाळून आपल्या आवडीच्या विषयांतील पुस्तके निवडण्यास उत्साह दाखविला.

ग्रंथालयाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करणे, ग्रंथालयाचा प्रभावी वापर वाढविणे आणि ज्ञानसंपन्न समाजनिर्मितीचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, ग्रंथालय कर्मचारी स्वप्नील कांगणे, रोशन गोरूले, मानसी पवार आणि अमोल वेलवणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.