संदीप गावडे आयोजित दंही हंडी उत्सवाचे शानदार उद्घाटन
अभिनेत्री रिंकु राजगुरुच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रुपेरी झळाळी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
संदीप गावडे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतात हे हरघर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून समोर आले. अभियानाचे जिल्हा संयोजक या नात्याने त्यांनी केलेल्या यशस्वी नियोजनामुळेच या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर राज्यात प्रथम आला. त्यांचे काम आणि कार्य पाहता भविष्यात ते निश्चितच वेगळी उंची गाठतील, अशा शब्दांत . सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी संदीप गावडे यांचे कौतुक केले.
भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गावडे आयोजित सुंदरवाडी दहीहंडी उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, युवा नेते संदीप गावडे, संदीप गावडे यांच्या मातोश्री सुनीता गावडे, वडील एकनाथ गावडे, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी सभापती, पंकज पेडणेकर,माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, शेखर गावकर, माजी जि.प. सभापती सौ. शर्वाणी गावकर, माजी उप सभापती शितल राऊळ, सागर कोकरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित या सुंदरवाडी दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून करण्यात आले. तर त्यानंतर दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध स्तरावर काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार संदीप गावडे यांच्या माध्यमातून करण्यात आला.
उद्घाटनानंतर या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले, संदीप गावडे हे उभरते नेतृत्व असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून ते पक्षाचे कार्य करत आहेत, त्यांचे सामाजिक काम पाहता पंचायत समिती सदस्य पदी त्यांना जनतेने बहुमताने निवडून दिले होते आज त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्या विभागातील बहुतांश ग्रामपंचायतीचे सरपंच ते निवडून आणू शकले येणाऱ्या काळात याच कामाच्या जोरावर ते निश्चितच राजकारणात मोठी उंची गाठतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी संदीप गावडे यांनी हे श्रेय माझे एकट्याचे नसून माझे मार्गदर्शक नेते तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व माझे सर्व सहकारी यांच्या साथीमुळेच मी सर्व करू शकलो. भविष्यातही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रात्री उशिरा सैराट सिनेमा फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने या दहीहंडी उत्सवात उपस्थित राहत सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या दिलखेचक अदाकारीने तिने उपस्थितांची मने जिंकली.
डिजेचा थरार व गोविंदा पथकांच्या थरारक मनोऱ्यांनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. रात्री उशिरापर्यंत हा उत्सव मोठ्या गर्दीत व उत्साहात सुरु होता.












