रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी शहराचा मानाचा बिंदू असलेल्या मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आक्षेपार्ह फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या तीन तरुणांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी शुक्रवारी सकाळी ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ तसेच स्थानिक शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला.
बुधवारी रात्रीच्या सुमारास मारुती मंदिर चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ तीन तरुणांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ काढले होते. हा प्रकार समोर येताच संपूर्ण शहरात आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ आणि शिवप्रेमींनी तातडीने एकत्र येत या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी पोलीस व स्थानिक प्रशासनाकडे केली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत या तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळे नगरपरिषद प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुतळा परिसरात नगरपरिषदेमार्फत सुरक्षारक्षक तैनात असणे अपेक्षित असताना, बुधवारी रात्री घटना घडली त्यावेळी तेथे एकही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य करणाऱ्या तीन तरुणांपैकी दोघे हे नगरपरिषदेने नेमलेल्या ठेकेदाराकडेच कामाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
शुक्रवारी सकाळी शिवप्रेमींनी पुतळा परिसरात एकत्र येत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर दैनदिन पूजा करण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी शिवरायांच्या जयघोषांच्या घोषणा दिल्या.















