कणकवलीत १.७९८ किलो गांजासह तिघेजण ताब्यात
मुख्य सूत्रधाराला घरातून घेतले ताब्यात
कणकवली : शहरात गांजा विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. गांगोमंदिर ते चौंडेश्वरी मंदिरादरम्यान गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणातील तिसरा आणि मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जाणाऱ्या शुभम राणे याला कणकवलीतील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ७९८ ग्रॅम गांजा, दोन दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सूर्यकांत राघो घाडीगावकर, शुभम राणे आणि एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे. तिघेही कणकवलीतील रहिवासी आहेत. गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाल्यानंतर गांगोमंदिर ते चौंडेश्वरी मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी दोन संशयितांना गांजासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई करत शुभम राणे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे कणकवली शहरातील गांजा विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.












