मे २०२६ मध्ये आंबोली येथे होणार महाअधिवेशन
कणकवली । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन, सावंतवाडी आयोजित कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यातील पतसंस्थांसाठीचे पदाधिकारी व व्यवस्थापक चर्चासत्र शिबिर नुकतेच कणकवली येथे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कणकवली सुनील मरभळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
यावेळी व्यासपीठावर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, संचालक बाबुराव कविटकर, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगावकर, सचिव महेश्वर कुंभार यांच्यासह पतसंस्थांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक सुनील मरभळ यांनी पतसंस्थांना ‘गरीब व बेरोजगार लोकांसाठीची महत्त्वाची व तात्काळ सेवा पुरवणारी यंत्रणा’ असे संबोधले. पतसंस्थांच्या सचिवांनी आत्मीयतेने काम करणे, संस्थेमुळे आपली ओळख व पत वाढते याची जाण ठेवणे आणि अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी प्रशिक्षणात सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी फेडरेशन हे पतसंस्थांचे हक्काचे व्यासपीठ असून सर्व संस्थांना एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पतसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे.
मे २०२६ मध्ये आंबोली येथे महाअधिवेशन:
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मे २०२६ मध्ये आंबोली येथे जिल्ह्यातील पतसंस्थांचे महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेला व आव्हानांना तोंड देण्यासाठी संघटित होऊन प्रभावीपणे काम करणे, समस्यांवर विचारमंथन करणे आणि मार्गदर्शन करणे हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश असेल. त्याची पूर्वतयारी म्हणून तालुका स्तरावर संघटना बांधणी सुरू आहे.
वसुली आणि प्रशिक्षण:अधिवेशनात पतसंस्थांच्या वसुलीसाठी आणि सक्षमीकरणसाठी अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. फेडरेशनकडून वसुली अधिकारी नेमून प्रभावी वसुली यंत्रणा राबवली जात आहे. पतसंस्थांनी वसुलीसाठी कलम १०१ चे दाखले फेडरेशनकडे सादर करण्याचे आवाहन श्री. राऊळ यांनी केले.
याचबरोबर, शासनाने दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या सायबर क्राईम व वसुलीसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील उत्कृष्ट प्रशिक्षण शिबिरात सर्व पतसंस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश्वर कुंभार यांनी केले, तर आभार प्रदर्शन जॉय डॉन्टस यांनी केले. या शिबिराला मोठ्या संख्येने पतसंस्था प्रतिनिधी उपस्थित होते.










