पन्हाळा प्रतिनिधी :
प्रतापसिंह काळे
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या काळात समाजाच्या पुढे जाण्याचा रस्ता तयार केला. शिक्षण, आरक्षण, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेले निर्णय आजही दिशादर्शक आहेत. अशा या लोककल्याणकारी राजाला मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा समाजभूषण श्री. लालासो अनुबाई आबाजी पवार यांनी केली.शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. मागासवर्गीय समाजाला आरक्षण देऊन सामाजिक न्यायाचा विचार प्रत्यक्षात आणला. मोफत व सक्तीच्या शिक्षणाबरोबरच वसतिगृहांची उभारणी केली. राधानगरी धरणाच्या माध्यमातून शेती आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक सुधारणांसाठीही त्यांनी धाडसी निर्णय घेतले.
शाहू महाराजांचे कार्य एखाद्या राजाच्या कारकिर्दीपुरते मर्यादित नाही. त्यामागे समता आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा विचार होता. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून सामाजिक न्यायाच्या विचाराचा सन्मान ठरेल, असे पवार यांनी सांगितले.यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आगामी संसद अधिवेशनात एकमुखाने आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी ही भूमिका मांडली.यावेळी भगवान देशमुख, रणजित गुर्जर उपस्थित होते.












