नवीन ऑफर्स आणि ग्राहक-केंद्रित डिजिटल सेवांची मोठी घोषणा
सावंतवाडी:
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने देशभरातील ग्राहकांसाठी अनेक नवीन डिजिटल उपक्रम, विशेष ऑफर्स आणि नेटवर्क विस्ताराची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विश्वासार्ह दूरसंचार सेवा प्रदाता म्हणून बीएसएनएलने परवडणारी, सुरक्षित आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा आपला निर्धार पुन्हा अधोरेखित केला आहे.
बीएसएनएलने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4G नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी देशभरात 26,300 हून अधिक अतिरिक्त BTS (Base Transceiver Station) साइट्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारामुळे शहरांसह ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्येही नेटवर्क कव्हरेज, कॉल गुणवत्ता आणि डेटा गतीत लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. भविष्यातील 5G सेवांसाठी सक्षम असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्कमध्येही व्यापक सुधारणा करण्यात येत असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नवीन ग्राहकांसाठी बीएसएनएलने ‘Re.1 Freedom 2.0’ ही विशेष ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत फक्त एका रुपयात २४ दिवसांची वैधता मिळणार असून दररोज 1 GB डेटा, 100 SMS आणि अमर्यादित व्हॉईस कॉल्सची सुविधा देण्यात येणार आहे. ग्राहकांना बीएसएनएल सेवा सहज आणि परवडणाऱ्या दरात अनुभवता याव्यात, यासाठी ही ऑफर तयार करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
ब्रॉडबँड ग्राहकांसाठी बीएसएनएलने 2,111 रुपये प्रतिमहिना दरात नवीन फायबर प्रीमियम प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 200 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड, 7,000 GB मासिक डेटा आणि 25 पेक्षा जास्त प्रीमियम OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सदस्यत्व देण्यात येणार आहे. एकाच कनेक्शनद्वारे ब्रॉडबँड आणि डिजिटल मनोरंजनाचा संपूर्ण अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर ‘BSNL Selfcare New’ हे नवीन अॅपही लाँच करण्यात आले आहे. या अॅपमधून प्रीपेड रिचार्ज, पोस्टपेड आणि लँडलाइन बिल पेमेंट, तक्रार नोंदणी व स्टेटस ट्रॅकिंग, DND व्यवस्थापन, पेमेंट हिस्टरी, AI चॅटबॉट सपोर्ट आणि मल्टिपल अकाउंट व्यवस्थापन अशा सुविधा उपलब्ध असतील.
Tango TV च्या सहकार्याने बीएसएनएल मोबाइल ग्राहकांना नवीन Selfcare अॅपद्वारे सुमारे 400 लाईव्ह टीव्ही चॅनेल्स मोफत पाहता येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ज्या भागात पारंपरिक मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाही, अशा दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या कठीण क्षेत्रांसाठी बीएसएनएल GSPS (Global Satellite Phone Service) सेवा उपलब्ध करून देणार आहे.
वार्षिक प्रीपेड ग्राहकांसाठीही विशेष लाभ जाहीर करण्यात आला आहे. बीएसएनएलच्या ₹2399 वार्षिक प्लॅनवर मर्यादित कालावधीसाठी अतिरिक्त 47 दिवसांची वैधता देण्यात येणार असून, एकूण वैधता 412 दिवसांची होणार आहे.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना चालना देण्यासाठी बीएसएनएलने पॉलीकॅबसोबत भागीदारी करून कॅमेरे, ONT, राऊटर्स यांसारखी दूरसंचार उपकरणे भारतातच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. EMS (Electronic Manufacturing Services) च्या माध्यमातून स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
बीएसएनएलने देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत, स्वदेशी तंत्रज्ञान, मजबूत नेटवर्क आणि ग्राहक-केंद्रित सेवांच्या माध्यमातून डिजिटल इंडियाचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.







