गौरव पोंक्षे | माखजन
गेली १५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या पूर्वीच्या मुंबई गोवा महामार्ग व आताचा पनवेल कन्याकुमारी या महामार्गाला जणू ग्रहण लागल्याची स्थिती आहे.गेली अनेक वर्षे लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या महामार्गाची सतत तोडफोड करून डागडुजी करावी लागत आहे.एकीकडे अपूर्ण काम आणि दुसरीकडे खराब होत चाललेला रस्ता यामुळे प्रवासी व वाहन चालक पुरते कंटाळले आहेत.
पनवेल ते कन्याकुमारी हा १६४० किमी इतक्या लांबीचा अद्याप पूर्ण झालेला नसून समस्यांनी ग्रासला आहे.पनवेल हून रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,गोवा,कर्नाटक,केरळ अशा महत्वाच्या ठिकाणाहून तामिळनाडूतील कन्याकुमारीत संपतो.केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सध्या ग्रहण लागले ले पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी उड्डाणंपूलाची कामे,रस्त्याची कामे अपूर्ण आहेत हा भाग वेगळा.पण पूर्ण काम देखील पुन्हा खोडाई करून पुन्हा काँक्रिटीकरण करावे लागते ही गंभीर बाब असल्याचे म्हटले जाते.रस्ता बांधकामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित होत आहे.
सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थे नजीक रस्ता खचला होता.भेगा पडल्या होत्या.अनेकदा मलमपट्टी करण्यात आली होती.परंतु अखेर काँक्रिट फोडून पुन्हा काँक्रिटीकरण करण्याची वेळ आली असून,सध्या काम सुरु आहे.जनतेची फसवणूक होत असलेल्या या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे.
संगमेश्वर ते चिपळूण भागात रस्त्यावर असंख्या ठिकाणी खड्डे पडले आहेत.रस्त्याला भेगा पडल्या आहेत.वाहने आपटत आहेत.काही ठिकाणी काँक्रिट निघून गेल्याने रस्ता खडबडीत झाला आहे.हे सार प्रवासी,वाहन चालक निमूटपणे सहन करत आहेत.या सगळ्या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी गणपती पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पालक मंत्री उदय सामंत यांनी पुढच्या वर्षीच्या गणेश उत्सवा आधी चिपळूण चा उड्डाणंपूल पूर्ण होईल असे आश्वस्त केले होते.संगमेश्वर येथील रखडलेले काम पूर्ण होईल असे सांगितले होते.परंतु आश्वासाने पूर्ण न झाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
चिपळूण च्या उड्डाणपूला वरून या वर्षी तरी वाहने जातील असे वाटले होते.परंतु चिपळूणकरांचा भ्रमनिरास झाला आहे.उड्डाणं पूल पूर्ण होई पर्यंत चिपळूण करांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान अनेक ठिकाणी पडलेले खड्डे,भेगा ह्या तात्काळ बुजवण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.अनेक ठिकाणी पाणी साचत आहे.याकडे ही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.













