लांजावासीयांच्या तीव्र नाराजीनंतर ठेकेदार कंपनीकडून उपायोजना
लांजा -: संतोष कोत्रे
लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथे उड्डाणपूलाच्या भरावाच्या भिंती च्या सिमेंट काँक्रेट प्लेट ढासळत असल्याच्या प्रकाराबाबत लांजातील नागरिकांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केल्यानंतर जाग आलेल्या महामार्ग ठेकेदार कंपनीकडून अखेर शुक्रवारी सॉइल नेलिंग करण्याचे काम करण्यात आले.
गेली पंधरा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर लांजा शहरातील रखडलेल्या उड्डाणपूल आणि भरावाच्या भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र शहरातील उपशेट्येवाडी येथे
उड्डाणपूलाच्या भरावाच्या भिंती च्या सिमेंट काँक्रेट प्लेट ढासळत असल्याचा प्रकार जुलै महिन्यात उघडकीस आला होता. त्यामुळे हे भरावाच्या भिंतीचे काम तकलादु आहे का? डेडलाईन पूर्ण करण्याच्या नादात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि लांजातील स्थानिक नागरिक यांच्या जीवाशी खेळ खेळला जातो आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता .
याबाबत लांजातील नागरिकांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीकडून ढासळलेल्या प्लेटच्या ठिकाणी सिमेंट लावून त्या बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तरीही हा संपूर्ण प्रकार धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनीला जाग आली असून त्यांनी शुक्रवारी उपाययोजना सुरू केली आहे. उड्डाणपुलाच्या निखळलेल्या प्लेट्स पूर्णपणे कोसळू नयेत म्हणून ठेकेदार कंपनी उपाययोजना म्हणून सॉइल नेलिंग करत आहे. यामुळे कमकुवत झालेल्या प्लेट्सच्या मधून लांब स्टीलच्या चार सळ्या थेट पुलाच्या आतील मजबूत भरावापर्यंत मशीनच्या साहाय्याने ड्रिल करून ३० फूट आत घुसवल्या जात आहेत. त्यांनतर सिमेंटच्या मिश्रणाने ते आत घट्ट केले जाणार असून त्यामुळे त्या प्लेट्स बाहेर सरकणे थांबेल, असे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, नागरिकांच्या रोषानंतर काम सुरू केले असले तरी पावसाळ्यात किंवा भविष्यात वाहतूक सुरू होईल तेव्हा जड वाहनांमुळे आतील माती भुसभुशीत झाली असल्यास केवळ नेलिंग करून किती सुरक्षितता राहील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची व भविष्यातील वाहतूक सुरक्षित राहण्यासाठी ठेकेदार कंपनीने पुलाचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी जोर धरत आहे.













