स्वातंत्र्यदिनानिमित्त देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रम-कार्यक्रम उत्साहात संपन्न

  देवरूख (प्रतिनिधी )

८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, महिला विकास विभाग व एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक उपक्रम-कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मतेची भावना, सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेची जाणीव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या उपक्रम-कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची देशभक्तीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे देशप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून शहीद स्मारक स्थळ व महाविद्यालय परिसर स्वच्छ केला.

१४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीतांचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नृत्य, ढोलकी वादन अशा कार्यक्रमांचे उत्साहात सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भारताच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तिमत्त्वांच्या आत्मचरित्रांचे, तसेच स्वातंत्र्याच्या रणसंग्रामावरील विविध ग्रंथ व पुस्तके प्रदर्शित करण्यात आली होती. यासाठी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, सहाय्यक स्वप्निल कांगणे व रोशन गोरुले यांचे उत्तम सहकार्य लाभले. याच दिवशी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी स्वतः बनवलेल्या राख्या, त्यांनी तयार केलेल्या संदेशासह पाठवून जवानांप्रती मनातील देशप्रेम आणि सैनिकांविषयीचा आदर दाखवून कृतज्ञता व्यक्त केली.

१४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘देशभक्तीपर पोस्टर्सचे प्रदर्शन’ भरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून देशभक्ती, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश प्रभावीपणे मांडले. ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण पाध्ये स्कूलचे कलाशिक्षक सुरज मोहिते यांनी केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
*प्रथम क्रमांक:* आर्या सुटाके व तन्वी धावडे- १२वी वाणिज्य.
*द्वितीय क्रमांक:* तन्वी रावणंग व वेदिका परबते- १२वी वाणिज्य.
*तृतीय क्रमांक :* भक्ती पर्शराम व कस्तुरी गीते- ११वी वाणिज्य.
*उत्तेजनार्थ प्रथम:* सेजल बोरे- ११वी वाणिज्य.
*उत्तेजनार्थ द्वितीय:* अक्षरा झगडे व अंजली कांबळे- १२वी बँकिंग.

स्वातंत्र्यदिनाच्या तीन दिवसीय आयोजित कार्यक्रम-उपक्रमाची सांगता १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाने झाले. यावेळी आर्मी व नेव्ही युनिटमधील कॅडेट्सनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन संचलन केले. याप्रसंगी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, पदाधिकारी कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व कार्यक्रम-उपक्रमांच्या दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मोहन लुंगसे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी, प्रा. मयुरेश राणे, प्रा. वसंत तावडे व प्रा. शिवराज कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या विविध कार्यक्रम-उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जबाबदारी, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय भावना अधिक दृढ झाली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या संपूर्ण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

*फोटो:* *स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम-उपक्रमांच्या फोटोंचा कोलाज*