सिंधुनगरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान; गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल
मसुरे | झुंजार पेडणेकर
क्रांती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबई आणि कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुनगरी येथील पत्रकार भवनात ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन, पुस्तक प्रकाशन व सन्मान गौरव सोहळा’ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी चिंदर गावचे सुपुत्र व नवोदित गायक कु. सोहम महेंद्र चिंदरकर याला त्याच्या गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण, उल्लेखनीय व प्रेरणादायी योगदानाची दखल घेत ‘कोकण स्तरीय गायन प्रेरणा गौरव पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडईकर तसेच ज्येष्ठ दशावतार कलाकार दादा राणे-कोनस्कर यांच्या हस्ते सोहमला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोहम याला सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या गायनातील सातत्य, कलागुण आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्याचे विशेष कौतुक केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार व गझलकार अतुल दिवे, निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार विजेते तुषार शिवशरण, सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर, ज्येष्ठ दशावतार कलाकार दादा राणे-कोनस्कर, पत्रकार संघ मुंबईचे राज्य सचिव डॉ. विश्वास आरोटे, प्रा. डॉ. बी. एन. खरात, सौ. ऋतुजा परब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
चिंदरच्या मातीतून गायन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कु. सोहम चिंदरकरच्या या यशाबद्दल चिंदर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.













