स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
बंदरातील गाळ काढण्यासह प्रस्तावित २२ कामांचे मच्छीमार संस्थांशी चर्चा करून नियोजन
सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथील मत्स्यबंदराच्या विकासासंदर्भात आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मत्स्यबंदराच्या विकासकामांमध्ये स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच बंदरातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या २२ कामांबाबत स्थानिक मच्छीमार संस्था आणि मच्छीमार प्रतिनिधींशी प्रत्यक्ष चर्चा करून योग्य नियोजन करावे, असेही निर्देश देण्यात आले. स्थानिक मच्छीमारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत मत्स्यबंदराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
या बैठकीला मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.












