दोडामार्ग: सुहास देसाई
घोटगेवाडी येथील कॉजव्यावरून दोन जण वाहून गेल्याच्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख व माजी उपसभापती राजेंद्र निंबाळकर यांची मदत मोलाची ठरली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता स्वतःच्या दोन रबर बोटी, प्रशिक्षित बोटचालक आणि संपूर्ण मनुष्यबळ घटनास्थळी उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
या शोध मोहीमे दरम्यान सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू टीमचे प्रमुख बाबल अल्मेडा यांचे पथक, आंबोली-सांगेली रेस्क्यू टीम, स्थानिक नागरिक आणि निंबाळकर यांचे पथक सलग दोन दिवस सक्रिय होते. सुरक्षेचा उपाय म्हणून तिलारी धरण आणि तेरवण मेढे उन्नयी बंधाऱ्यातील पाण्याचा विसर्ग बंद करून दोन रबर बोटींच्या साहाय्याने नदीपात्रात शोध घेतला गेला. दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांनीही स्वतः बोटीतून शोधकार्यात सहभाग घेतला.
पहिल्या दिवशी कॉजव्यापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत ८ वर्षीय बालकाचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. अंधार झाल्यामुळे रात्री शोधकार्य थांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजल्यापासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली असून दुसऱ्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरू आहे.
संकटाच्या वेळी स्वतःची साधने आणि पथकासह धावून आलेल्या राजेंद्र निंबाळकर यांच्या तत्परतेचे बाबल अल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमसह प्रशासनाने आणि स्थानिकांनी विशेष कौतुक केले.
जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या दुर्घटनेनंतर परिसरातील आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तिलारी धरण आणि तेरवण मेढे बंधारा परिसरात पावसाळ्यात निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, येथे रेस्क्यू बोटी उपलब्ध ठेवण्याची मुख्य जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. मात्र, प्रत्यक्ष दुर्घटनेवेळी खासगी बोटींवर अवलंबून राहावे लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. भविष्यात अशा आपत्तीच्या वेळी यंत्रणेची धावपळ होऊ नये यासाठी जलसंपदा विभागाने या भागात कायमस्वरूपी किमान दोन रेस्क्यू बोटी व प्रशिक्षित चालक सज्ज ठेवावेत, अशी जोरदार मागणी आता जनतेतून केली जात आहे.













