सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा तिढा सुटण्याची शक्यता 

२० ऑगस्टच्या सुनावणीपूर्वी आ. दीपक केसरकर व ॲड. शिशिर हिरेंकडून नियोजित जागेची पाहणी 

 

सावंतवाडी:

येथील बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अडसर ठरलेली जमिनीची कायदेशीर कोंडी अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. राजघराण्याच्या दोन्ही कुटुंबांनी या जागेसाठी आवश्यक असलेले संमतीपत्र दिले असून, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात गुरुवारी २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ॲड. शिशिर हिरे यांनी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह या नियोजित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यासाठी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनाने ३६.५६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर १७.६६ कोटी रुपयांचा करारनामा होऊन २४ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयात दाखल झालेल्या दिवाणी दाव्यामुळे ही जमीन न्यायप्रविष्ट बनली होती आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जागेचे प्रत्यक्ष हस्तांतरण होऊ शकले नव्हते.

यावर तोडगा काढण्यासाठी महसूल व वन विभागाने २६ जुलै २०२३ रोजी विशेष शासन निर्णय जारी करून जिल्हाधिकाऱ्यांना तडजोड कराराचे निर्देश दिले होते. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार एकूण १४,३७७.९० वर्ग मीटर जागेपैकी ५,००० वर्ग मीटर खुले क्षेत्र प्रतिवादींना विनामोबदला देण्याचे निश्चित झाले. तसेच न्यायालयात १,४०० वर्ग मीटर जागा देण्याबाबतही तडजोड झाली असून, प्रत्यक्ष रुग्णालयाच्या बांधकामासाठी आता ५,५०९.२८ वर्ग मीटर क्षेत्र शिल्लक राहिले आहे.

दरम्यान, भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार जुना आराखडा अपुरा पडत असल्याने, ६ मे २०२६ रोजी मुंबईत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली होती. त्यानुसार खाजगी वास्तुशास्त्रज्ञांमार्फत सुधारित आराखडे व अंदाजपत्रक तयार करून ते अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांकडे (मुंबई) सादर करण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ॲड. शिशिर हिरे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची पाहणी केली. यावेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, पीडब्ल्यूडी अधिकारी लोहार, महसूल विभागाचे प्रतिनिधी किरण गजिनकर यांच्यासह रुग्णालयाचे डॉक्टर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासकीय मान्यता व मंजुरीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ होणार असल्याने सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांना लवकरच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.